मृत वृध्देच्या अंतिमसंस्काराला कोणीही पुढे न आल्याने पाळी. स्थानिक नगरसेविका-युवा महिला कार्यकर्त्याच्या कर्याचे कौतुक
डिचोली/प्रतिनिधी
कोरोनामुळे आज या जगात आणि भारतात निर्माण झालेल्या महमारीने लोकांना अनेक बरे वाईट अनुभव दिले. अनेक बाबतीत बोधही दिला. एकमेकांना या नाजूक काळात सहकार्य आणि मदतीचा हात देण्याची शिकवणही दिली. गरीब आणि श्रीमंत यामध्ये फरक न ठेवता सर्वांना एकाच तराजूत तोलण्याची परिस्थिती या महामारीने आज लोकांवर आणली आहे. या महामारीच्या काळात कोणावर कशी परिस्थिती ओढवेल ते सांगता येणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत मानवतेची जाणीव ठेवत मानवीधर्माला जागण्याची प्रेरणा मात्र काल हाऊसिंग बोर्ड साखळी येथे स्थानिक नगरसेविका शुभदा सावईकर, युवा महिला कार्यकर्या सिध्दी प्रभू आणि संतोष भगत यांनी सर्वांसमोर निर्माण केली.
काल रविवारी (दि. 9 मे) हाऊसिंग बोर्ड सखळी येथील एका घरात एका वृध्देचे निधन झाले. सदर घरामधील सदस्या कोरोनाची लागण झाल्याने वृध्देच्या अंतिमसंस्काराला आणि त्याची तयारी करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने सदर घरातील सदस्यांनी या हाऊसिंग बोर्ड रहिवासी सोसायटीचे अध्यक्ष संतोष भगत, सचिव सिध्दी प्रभू, आणि स्थानिक नगरसेविका शुभदा सावईकर यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभिर्य आणि एका असहाय्य कुटुंबाची गरज ओळखून या तिघांनीही मृत वृध्द महिलेच्या अंतिमसंस्काराची तयारी आपल्याच खांद्यावर घेतली. इतरांच्या मदतीची अपेक्षाही ठेवली, मात्र कोणीही पुढे येत नव्हते. त्याला तशी इतरही कारणे होतीच.
नगरसेविका शुभदा सावईकर, सिध्दी प्रभू व.संतोष भगत यांनी या अंतिमसंस्काराची तयारी करताना मृतदेह नेण्यासाठी लागणाऱया तिरडीसाठी एका बांबुची व्यवस्था केली. तिरडीसाठी आवश्यक प्रमाणे तो कापून स्वतःच्या हाताने तिरडी बांधली. इतर सर्व तयारी व व्यवस्था करून शववाहीकेत सदर मृतदेह सुध्दा त्यांनीच ठेवला आणि नंतर त्यावर स्थानिक स्मशानभूमीत कुटुंबसदस्यांकडून अंतिमसंस्कार करण्यात आले. महिला आणि अशा कामांमध्ये हात घालावा ? या प्रश्नाला या महिलांनी आपल्या कामातूनच उत्तर देत आज या देशात आणि रज्यातही महिला कोणत्याही कामात मागे नाही याची प्रचिती आणून दिली. परिस्थितीनुसार महिलाही आपले रूप बदलून समाजाला दिशा दाखवू शकतात, हेच त्यांनी आज दाखवून दिले. आजच्या या नाजूक आणि संवेदनशील परिस्थितीत कोणावर कोणत्या क्षणी कसली वेळ येऊ शकते याचा अंदाज आम्ही लावू शकत नाहीच. मात्र अशा वेळी केवळ आपल्यातील सामाजिक आणि मानवीधर्माला जागण्याची गरज आहे. आज साखळीत झालेल्या या प्रकारातून एक चांगलाच धडा मानवतेला मिळाला आहे. या कार्याचे मात्र संपूर्ण साखळीत आणि परिसरात कौतुक होत आहे.









