प्रतिनिधी/ फलटण
साखरवाडी येथील सुबत्ता श्रीमंत रामराजे यांच्या मुळेच असे वक्तव्य फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण यांनी साखरवाडी येथे केले. साखरवाडी येथील वार्ड क्रमांक तीन मधील भांडीवाले जमात वस्तीच्या मरीमाता देवी सभामंडपाच्या भूमिपूजन समारंभाच्या वेळी आमदार दिपक चव्हाण बोलत होते.
यावेळी महानंद डेअरी मुंबई चे उपाध्यक्ष डि. के पवार,माजी सभापती शंकराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, माजी सभापती रेश्माताई भोसले, होळ सोसायटीचे चेअरमन हनुमंत भीमराव भोसले, बापूराव भोसले, के. के. भोसले, संजय भोसले, अभयसिंह ना.निंबाळकर, दिलीप पवार, अंकुशराव साळुंखे, तुकाराम पवार, किरण साळुंखे, पाटील, शरद जाधव, अरुण गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार दिपक चव्हाण म्हणाले की, यापुढे साखरवाडी ग्रामपंचायतीची सत्ता राजे गटाच्या ताब्यात ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांनी आतापासूनच लोकांच्या संपर्कात राहण्याची गरज असून एकत्र काम करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा तसेच फलटण तालुक्यातील सर्वच विकासकामे ही नेत्यांच्या माध्यमातून होत असतात,परंतु त्याचे श्रेय दुस्रयाला घेऊ देऊ नका असाही सल्ला गटातील कार्यकर्त्यांना यावेळी चव्हाण यांनी दिला. पाठीमागे या साखरवाडी ग्रामपंचायत मध्ये आपली सत्ता होती म्हणून श्रीमंत संजीवराजे यांनी कामे दिली परंतु त्याचे भांडवल इतर लोकांनी तयार केले म्हणून आगामी काळात गाफील न राहता लोकांची कामे करून देण्यासाठी आपण प्रयत्नवादी रहा असा सल्ला पुन्हा एकदा आमदार दिपक चव्हाण यांनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला.
मागील पाच वर्षात राजे गटाच्या माध्यमातून एकही कार्यक्रम नसल्याने विकास कामाच्या बद्दल लोकांचा संभ्रम झाला म्हणून मी केल्याची भावना साखरवाडीतनिर्माण झाली. त्यासाठी आमदार साहेबांनी वेळोवेळी साखरवाडीत येऊन या गावात विकास कामांना गती देण्याचे काम करून लोकांचा गैरसमज दूर करावा असे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकराव माडकर यांनी सांगितले.श्रीमंत रामराजे यांच्यासारखे या तालुक्याला नेतृत्व मिळाले असून साखरवाडीच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सत्ताही राजे गटाकडेच राहिली पाहिजे त्यासाठी तरुणांनी नेतृत्व करावे, असे आवाहन यावेळी माडकर यांनी केले.
साखरवाडीतील सर्व सभामंडप हे आमदार व खासदार फंडातून झाले असल्याचे महानंदा चे उपाध्यक्ष डी.के पवार यांनी सांगून शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्ना संदर्भात रामराजेच लक्ष घालतील असे पवार यांनी सांगितले. न्यू फलटणचे संकट रामराजे यांनी सोडवले त्यामुळेच या भागातील उद्योग धंदे सुरू झाले. आम्हाला सत्ता असो किंवा नसो आम्ही जनतेच्या कामासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे डी.के पवार यांनी यावेळी सांगितले.








