रियाध
पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना अर्थात ओपेक व अन्य सदस्य देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन अलीकडच्या काळात वाढवले आहे. दरम्यान सप्टेंबरमध्ये साऊदी अरेबियाची निर्यात ही 8 महिन्याच्या उच्चांकावर राहिली असल्याची माहिती आहे. मागणीत झालेल्या वाढीची दखल घेत साऊदी अरेबियाने उत्पादनात वाढ करण्यात आल्याचे सांगितले आहे. याउलट 2020 मध्ये उत्पादनात घट करावी लागली होती. त्यावेळी कोरोनामुळे मागणीवर मोठा परिणाम दिसला होता. साऊदी अरेबियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत सप्टेंबरमध्ये सलग पाचव्या महिन्यात वाढ झाल्याचे दिसले आहे. जानेवारीनंतर सर्वाधिक निर्यात कच्च्या तेलाची करण्यात आल्याचे समजते. देशाने सप्टेंबरमध्ये 6.516 दशलक्ष बॅरेल प्रति दिवस याप्रमाणे कच्च्या तेलाची निर्यात केली. जी ऑगस्टमध्ये 6.450 दशलक्ष बॅरेल प्रति दिवस अशी होती. तेल उत्पादनांसह एकूण निर्यात 7.84 दशलक्ष बॅरेल प्रति दिवस इतकी राहिली आहे.









