वार्ताहर / कास :
गुरूवारी परळी खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने पळसावडे धरण ओव्हरप्लो झाले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने सांडवली, पळसावडे, वारस मोरबाग, गणेशवाडी गावांकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
डोंगरी भागात पावसाची मुसळधार सुरू आहे. त्यामुळे भूसंख्यलन होऊन जमीन खचू लागली आहे. ओढ्यांना पुर आले आहेत. परळी खोऱ्याच्या डोंगरमाथ्यावरील पळसावडे धरण ओव्हरफ्लो होऊन पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे सांडवली कडे जाणारा रस्ता धरणाजवळ खचला असल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. दुधाची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांसह अन्य वाहने गावातच अडकुन पडली आहेत.