कास / वार्ताहर :
अतिवृष्टीमुळे सांडवली ता. सातारा येथे डोंगर कडा अथवा दरड कोसळण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माळीण अथवा आंबेघरसारखी दुर्घटना सांडवली येथे घडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सांडवली गावठाणाचे पुनर्वसन लगतच्या पठारावर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला असून, याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील पांगारे धरण येथील खचलेला रस्ता, पळसावडे धरण, बोन्डारवाडी येथे झालेले नुकसान आणि सांडवली येथील नुकसान व डोंगरामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची पाहणी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हाधिकारी सिंह यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी जि प सदस्य राजू भोसले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे, बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल अहिरे, प्रशांत खैरमोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सांडवली ग्रामस्थांची गंभीर समस्या सोडवण्यासाठी गावठाणचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात डोंगर कडा, दरड कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने तातडीने हालचाल करावी. पुनर्वसनासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. गावठाण पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच खड्गाव पासून रस्ता रिंगरोडला जोडून हा भाग थेट परळीला जोडण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पांगारे येथील खचलेल्या रस्त्याबाबत तोडगा काढण्यावरही सकारात्मक चर्चा झाली.









