समाजमाध्यमांवर झळकविले वेळापत्रकाचे बॅनर्स
प्रतिनिधी / सांगे
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यातील टीका उत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला असून प्रत्येक पंचायत क्षेत्रात सध्या लसीकरण चालू आहे. मात्र याची जोरदार जागृती सध्या राजकारण्यांकडून समाजमाध्यमांवर चालू आहे. कोरोनावर लसीकरण हाच पर्याय असल्याने लोक लस घेण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. सांगेत समाजमाध्यमांवर सध्या राजकारण्यांच्या लसीकरण जागृतीचे बॅनर्स झळकू लागले आहेत. यात माजी आमदार सुभाष फळदेसाई आणि समाजसेविका व भाजपच्या राज्य महिला मोर्चा उपाध्यक्षा सावित्री कवळेकर आघाडीवर आहेत.
मतदारसंघात सध्या टीका उत्सवानिमित्त लसीकरण कार्यक्रम चालू आहे. 16 पासून 20 पर्यंत नेत्रावळी पंचायत हॉलमध्ये लसीकरण चालू आहे. 21 ते 23 पर्यंत वाडे-कुर्डी येथील सरकारी हायस्कूलमध्ये लसीकरण त्यानंतर 24 ते 26 पर्यंत उगे ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांसाठी पंचायत हॉलमध्ये, तर 27 ते 30 पर्यंत भाटी ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांसाठी सरकारी मिडल स्कूल, भाटी येथे लसीकरण होणार आहे. 18 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.
याशिवाय नेत्रावळीचे उपसरपंच अभिजित देसाई यांच्यासह अन्य काही जणांनी लसीकरणाचे वेळापत्रक समाजमाध्यमांवर टाकलेले आहे. प्रत्येक जण आपल्या परीने हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात टीका उत्सवाची जोरदार तयारी व जनजागृती माजी आमदार फळदेसाई व त्या त्या भागातील भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. टीका उत्सवामुळे लसीकरणाला बरीच गती मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकारणी सध्या कोणतीही संधी सोडत नाहीत असे दिसून येते.









