प्रतिनिधी/ सांगे
सांगे मतदारसंघासाठी भाजपतर्फे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी उमेदवारी अर्ज सांगेचे निर्वाचन अधिकारी पांडुरंग तळगावकर यांच्याकडे सादर केला. यावेळी माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, बायो भंडारी, सुभाष वेळीप, प्रभारी गणपत नाईक, वैशाली नाईक, भारती नाईक, संजय रायकर इत्यादी हजर होते.
सांगे मतदारसंघासाठी भाजपने सुभाष फळदेसाई यांची यापूर्वीच अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे. फळदेसाई यांनी प्रचारकार्यात जोर लावला असून मतदारांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटल्याची टीका त्यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते जमले होते. अर्ज भरल्यानंतर फळदेसाई यांनी उपस्थितांच्या भेटी घेतल्या.









