प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरात होत असलेला अपुरा पाणीपुरवठा, गॅस पाईप लाईनसाठी उकरण्यात आलेल्या रस्त्यांच्या नुकसान भरपाई वरून स्थायी समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभापतीसह अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. अखेर बैठक घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश सभापती पांडुरंग कोरे यांनी संबंधित अधिकर्यांना दिले. नुकसान भरपाई भरून घेण्याचा विषय आघाडीच्या विरोधानंतरही मंजूर करण्यात आला.
सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या सुरवातीलाच काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके यांनी अपुऱ्या पाणी पुरवठयावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी कमी दाबाने आणि अपुरे का येते असा सवाल उपस्थित केला. प्रत्येक सभेत पाणी प्रश्नावर चर्चा होते. सभापती पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देतात. अधिकारी मात्र सभापतींच्या सूचनांचे पालन करत नाहीत ? सभापतींना काही अधिकार आहेत की नाही असा सवाल चव्हाण, मुळके यांनी उपस्थित केला. पाणी प्रश्न निकालात निघत नाही तोपर्यन्त सभा तहकूब करा, अशी मागणी चव्हाण, मुळके यांनी केली. अखेर उपयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पाणी पुरवठ्याबाबत तात्काळ मार्ग काढण्याची सूचना सभापती कोरे यांनी केली.