खासदार संजयकाका पाटील यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने निवेदन
प्रतिनिधी / सांगली
सर्वोच न्यायालयाने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुल्कामध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. या शिक्षण संस्थांच्या अडमुठेपणाच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने खासदार संजयकाका पाटील यांना शहर जिल्हाध्यक्ष डॉ. शुभम जाधव व शहर जिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे यांनी केंद्र सरकारच्या आखत्यारीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध मागणीचे निवेदन दिले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश प्रभारी सनी मानकर व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व शिक्षण संस्थांना निर्देश दिलेत की, आपण आपल्या शिक्षण शुल्कात (Tuition Fee) रास्त कपात करावी. मात्र, इ. १ ली ते १२ वी चे शिक्षण देणाऱ्या CBSE, ICSE बोर्डाच्या शिक्षण संस्था तसेच अभिमत विद्यापीठे हे संपूर्णपणे केंद्र शासनाच्या अंतर्गत येत असून याबाबत कोणतीही शिक्षण संस्था आणि विद्यापीठे भूमिका घेत नसून याउलट काही ठिकाणी संस्था शुल्क वाढ करत आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत, अशा सुविधांचे पण शुल्क घेत आहेत. हि सर्वस्वी विद्यार्थ्यांची लूट आहे. याबाबत आता केंद्र सरकारनेच संबंधित सर्व शिक्षण संस्था यांना निर्देश देणे गरजेचे आहे, अश्या संस्थांची तक्रार करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल अथवा तत्सम यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, शैक्षणिक कर्जाचे व्याज माफ करावे, असे मुद्दे निवेदनात आहेत.
यावेळी खासदार पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ. शुभम जाधव यांनी सांगितले. यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे उपस्थित होते.