गुरुवारपासून ‘जनता कफ्यू’ सुरु
नगरपालिकेतील व्यापारी बैठकीनंतर वैभव पाटील यांची घोषणा
प्रतिनिधी / विटा
विटा शहरासह तालुक्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या पाहता साखळी तोडण्याचे आव्हान आपणा सर्वांच्या समोर आहे. त्यासाठी विटा नगरपालिकेत व्यापारी प्रतिनिधी आणि नागरिकांच्या नागरिकांची बैठक झाली. यामध्ये विटा शहरात गुरुवार १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर अखेर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, विटा शहरासह खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज पन्नासावर रुग्ण शहरात आणि तालुक्यात वाढत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी साखळी तोडणे हा प्रभावशाली उपाय आहे. त्यासाठी शहरात काही दिवसासाठी जनता कर्फ्यु लागू करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत होती. गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन करणे हे उपाय केले पाहिजेत. गर्दी टाळण्यासाठी बाजरपेठ बंद असणे गरजेचे आहे, तसेच विनाकारण रस्त्यावरील गर्दी टाळणे देखिल महत्त्वाचे आहे.
या पार्श्वभूमीवर राजकिय नेत्यांसह सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांची बैठक मंगळवारी विटा पालिकेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात झाली. या बैठकीत उद्या गुरुवार 10 सप्टेंबर पासून गुरूवार 17 सप्टेंबरपर्यंत आठ दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला, असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.
17 सप्टेंबर नंतर दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दुकाने सुरू राहतील. तर दर रविवारी संपूर्ण दिवस जनता कर्फ्यु पाळण्याबाबत व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. यापूर्वी झालेल्या जनता कर्फ्यु ला विटेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा निर्णय घेण्यामागे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हेतू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या मनाने पाठींबा दिला आहे. आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, संजय तारळेकर, डॉ. शंकर बुधवाणी, अमृतराव नाईक-निंबाळकर, विनोद पाटील, फार्मसी संघटनेचे अनिल देशमुखे, प्रताप सुतार, फिरोज तांबोळी, दीपक शितोळे, अजय पांडकर यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.








