प्रतिनिधी / विटा
कोरोनाच्या महामारीमुळे जनता त्रस्त आहे. रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठ दिवसाचा कोरोना बाधित रुग्णांचा चढता आलेख पाहता नवीन रुग्णाला बेड शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याहूनही दुर्दैव म्हणजे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसलेने ऑक्सिजन शिवाय रुग्ण दगावताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर विटा नगरपरिषद येथे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत नगरपरिषदेचे 50 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
याबाबत बोलताना माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, या बिकट परिस्थितीमध्ये सर्व सामाजिक संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये विटा नगरपरिषद सुद्धा कमी पडणार नाही. येत्या काही दिवसातच 50 बेडच्या सुसज्ज कोविड सेंटरची उभारणी करणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये दोन व्हेंटिलेटर, दोन ड्यूरा सिलेंडर, दोन ऑक्सीजन फ्लो मशीन, पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन, 50 बेडपर्यंत ऑक्सिजनची पाईपलाईन, एक ईसीजी मशिन, पी पी इ किट, सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज, इन्व्हर्टर, 50 तयार बेडची उपलब्धता, अशा सर्व सोयीनीयुक्त कोविड सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
समाजातील दातृत्वाचा ओघ सुरू
या हॉस्पिटलमध्ये लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आदर्श नर्सिंग स्कूलचा नर्सिंग स्टाफ असणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. विटा नगर परिषदेच्या या उपक्रमासाठी नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार देण्याची तयारी दर्शविली आहे. विटा सराफ असोसिएशनने दोन लाख रुपये, आनंदराव शेठ देवकर यांच्या स्मरणार्थ साहिल व शुभम देवकर यांनी पाच लाख रुपये देण्याचे ठरविले आहे, असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय काका पाटील यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व श्रेयस उद्योगसमूहाचे अध्यक्ष बाबासाहेब मुळीक, मनमंदिर उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक गायकवाड, विटा यंत्रमाग असोसिएशन, विविध व्यापारी संघटना, गलाई बांधव या उपक्रमासाठी भरघोस मदत करणार आहेत, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
फिव्हर क्लिनिकमध्ये अँटिजेनची सुविधा
विटा नगरपरिषद शाळा नंबर 2 येथे फीवर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आलेली आहे. याचाही सर्व नागरिकांना लाभ घ्यावा होईल. त्या ठिकाणी अँटीजेन्ट टेस्ट करण्यासाठी 2000 टेस्टिंग किटची उपलब्धता करून दिलेली आहे, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleसांगली : वाढत्या रूग्णसंख्येला प्रशासन जबाबदार
Next Article सातारा जिल्ह्यात 306 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज








