प्रतिनिधी / मिरज
गेल्या अनेक महिन्यांपासून मृत्यूचा सापळा बनलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनाच हातात खोरे आणि पाटी घेऊन रस्त्यावर उतरावे लागले. सोमवारी पावसाचे पाणी साचून महात्मा गांधी चौकात भल्यामोठय़ा खड्डय़ात तळे साचून अपघाताला निमंत्रण दिले जात होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे मुजविण्याच्या कामाला सुरूवात केली.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 येथील कामातील एक डंपर मुरूम मागवून घेऊन सदरच्या रस्त्यावरील खड्डे मुजवून वाहतुकीला मार्ग सुरक्षित करुन दिला. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग रस्त्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या सत्ताधारी आणि अधिकाऱ्याच्या डोळ्यात वाहतूक पोलिसांनीच झणझणीत अंजन घातले आहे.