प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात सरासरी 8.91 मिमी पावसाची नोंद झाली असली तरीही शिराळा तालुक्यात वारणेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. परिणामी चांदोली (वारणा) धरणाचा विसर्ग 4400 वरून 6500 क्युसेक्स करण्यात आला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा मध्ये पाऊस निम्म्यावर आला आहे तर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात थोडी उसंत मिळाली आहे. भिलवडी येथे पाणी पातळी पाच फुट तर आमणापूर येथे सात फूट कमी झाली आहे. सांगलीत 23 फुटावर स्थिर आहे. कोयनेत 70.29 इतका पाणी साठा आहे.पाणी कमी झाल्याने सांगली शहराला दिलासा मिळाला आहे.
कोयना, महाबळेश्वर आणि नवजा येथे पाऊस कमी झाला आहे. गुरुवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत कोयना 81 मिमी पाऊस होता. तो शुक्रवारी 41 मिमी झाला. महाबळेश्वर 135 वरून 35 मिमी तर नवजा येथे 48 वरून 35 मिमी वर पोहोचला. पावसाने उसंत दिल्याने कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे.
कृष्णेत मागे उतरले पुढे वाढले
पाटबंधारे विभागाने यापूर्वीच कोयानेत 80 टीएमसी साठा झाल्याशिवाय विसर्ग न करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान कृष्णेतील पाणी झपाट्याने उतरत आहे. कराड, बहे, ताकारी येथे पाणी उतरले आहे. आमणापुर येथे पुलाजवळ 5 आणि घाटाजवळ 8 फूट पाणी उतरले आहे. औदुंबर येथेही 4 फूट पाणी कमी झाले आहे. भिलवडी पुलाजवळ पातळी 26 वरून घटत साडे एकवीस फुटावर पोहोचली आहे. नागठाणे पुलावर येऊ पाहणारे पाणीही गुरूवारपासून उतरायला सुरुवात होत पात्रात स्थिरावले. सांगली शहारा मध्ये दिवसभर पाणी पातळी 23 फूट 9 इंचावर पोहोचून पुन्हा तीन इंचाने उतरली. मात्र त्याचवेळी अंकली पुलाजवळ दिवसभर पाणी स्थिर होते. तर म्हैसाळ आणि राजापूर येथे पाणी वाढलेले दिसून आले. धरण परीचलन नियमावली नुसार पाणी सोडले जाणार असल्याने कोयनेतील पाणी तातडीने बाहेर सोडले जाणार नाही. सध्या कोयनेमध्ये 70.29 टीएमसी इतका पाणी साठा आहे.
शिराळा सोडून इतरत्र पावसाचा जोर कमी
सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वाधिक 45.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मांगले परिसरातील ६ पैकी ३ मार्गावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.5 (307.6), तासगाव 3.4 (290), कवठेमहांकाळ 2.3 (358), वाळवा-इस्लामपूर 9.5 (340.3), शिराळा 45.5 (766.4), कडेगाव 7.6 (294.8), पलूस 1.0 (245.4), खानापूर-विटा 4.0 (399.4), आटपाडी 0.0 (253.0), जत 2.4 (207.2).
Previous Articleजागतिक बाजारातील संकेतामुळे तेजीची झुळूक
Next Article दिल्लीत दिवसभरात 1192 नवे कोरोना रुग्ण; 23 मृत्यू








