प्रतिनिधी / मिरज
एकीकडे शहर सिमेंटच्या इमारतींनी व्यापून गेले असताना मोजक्याच ठिकाणी शिल्लक राहिली असलेली हिरवीगार झाडे तोडण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. शहर बस स्थानक ते रेल्वे स्टेशन समोरील प्रस्तावित ट्रीमिक्स रस्ता कामासाठी सुमारे शंभर-दीडशे वर्षापूर्वींची झाडे तोडली जाणार आहेत. त्यापैकी काही झाडे रविवारी तोडण्यात आली. त्याला वृक्षप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

वृक्षांचे संगोपन करण्याची मागणी
मुख्य शहर बस स्थानक ते रेल्वे स्टेशन या मार्गावर रस्ता रुंदीकरण होणार असून, या रस्त्याचे ट्रीमिक्स पद्धतीने डांबरीकरण होणार आहे. या रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडण्यात येणार आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजूला चिंच, वड आणि कडुलिंबाची अनेक झाडे आहेत. सुमारे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी ही झाडे लावण्यात आली आहेत. त्यातच या परिसरात मोजकीच झाडे शिल्लक राहिली आहेत.
हा रस्ता ट्रीमिक्स पद्धतीने करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असून, काही दिवसांपूर्वीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. हा रस्ता करण्यापूर्वी रुंदीकरण केले जाणार असल्याने सदरची झाडे तोडली जाणार आहेत. रविवारी या झाडाच्या मोठ्या फांद्या तोडण्यात आला. त्यावेळी वृक्षप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शविला.








