संस्थेने अन्याय केल्याची भावना, नोकरीत कायम करण्याची मागणी, ९ मे पासून उपोषण
वार्ताहर / खानापूर
रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील हंगामी सेवक म्हणून अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या विनाअनुदानित सी. एच. बी. असलेल्या शिक्षकांना कायम करण्यात यावे, यासाठी खानापूर तालुक्यातील शिक्षकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशीच आमरण उपोषण सुरू केले आहे. या शिक्षकांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशारी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राज्याचे सचिव, शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.
निवेदनात केलेली मागणी अशी, महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेत हजारो शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात अत्यल्प मानधनावर गेली १० ते १५ वर्षे काम करत आहेत. या शिक्षकांना फक्त दोन ते तीन हजार रुपये मानधन दिले जात होते.
एवढ्या कमी मानधनावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम या शिक्षकांनी प्रामाणिकपणे केले आहे. या शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याच्या अपेक्षेवर रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्याय केला असून जे हक्काचे अत्यल्प मानधन दिले जात होते ते ही वर्षभरानंतर काटछाट करून दिले जाते. कोरोना महामारीत शिक्षकांना घर चालवणे मुश्कील बनले आहे. मागील कोरोना काळात कसे बसे दिवस काढले मात्र या वर्षी अचानक लॉक डाऊन झाल्याने रोजचा घर खर्च भागवणे महाकठीण बनले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशीच आपापल्या घरी साखळी उपोषण सुरू केले आहे. २०१६ साली सातारा मुख्यालया समोर उपोषण केले होते. २०१७ साली पुन्हा न्याय हक्कासाठी पुणे येथे उपोषण करण्यात आले होते. ९ मे पासून या सेवकांनी घरी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून खानापूर तालुक्यातील या सेवकांनी उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणाची दखल घेऊन हंगामी सेवकांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे.