मंडळांच्या अध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / मिरज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करून कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी शहरातील संयुक्त मंगळवार पेठ आणि शिव ईच्छा ग्रुप या दोन मंडळांवर मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना दिल्या असतानाही महाप्रसाद आणि मिरवणुकीचे आयोजन करून एक हजार ते दीड हजार लोकांचा जमाव जमविल्याचा ठपका या मंडळांवर ठेवण्यात आला आहे. दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांसह 14 जणांवर राष्ट्रीय आपत्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजी महाराज जयंती निमित्त संयुक्त मंगळवार पेठ मंडळाने मिरवणुक काढली होती. तर पारिट गल्ली येथील शिव ईच्छा ग्रुपने महाप्रसादाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही महाप्रसाद आणि मिरवणुकीचे आयोजन करून हजार-दीड हजार लोकांचा जमाव जमवून राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला. त्यामुळे शहर पोलिसांनी दोन्ही मंडळांवर गुन्हा दाखल केला आहे.








