कारण अस्पष्ट : घटनेने मांजर्डे पंचक्रोशी हादरली
वार्ताहर / मांजर्डे
तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे दोघांचे मृतदेह सापडले. यात मांजर्डे येथील अजित साळुंखे तर आरवडे येथील तानाजी शिंदे यांचा मृतदेह एस टी स्टँडमध्ये सापडला. दोघांचाही रात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. दोघांच्याही अंगावर जखमांचे व्रण आहेत. शनिवार 3 रोजी मध्यरात्री अजित बाबुराव साळुंखे (48 वर्षे) रा. मांजर्डे व तानाजी शिवराम शिंदे (62 वर्षे) रा. आरवडे या दोघांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांच्या विरूध्द तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
या प्रकरणी चंद्रकांत बाबुराव साळुंखे रा. मांजर्डे ता. तासगाव यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे. दि. 4 जुलै रोजी सहा वाजण्यापूर्वी मांजर्डे गावातील एस. टी स्टॅण्ड चौकाजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव माझा भाऊ अजितकुमार बाबुराव साळुंखे वय 48 रा. मांजर्डे व तानाजी शिवराम शिंदे वय 62 रा. आरवडे यांच्या डोक्यामध्ये दगड घालून गंभीर जखमी करून दोघांनाही जीवे ठार मारून त्यांचा खून केला आहे. असेही या फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी सकाळी पाचच्या सुमारास प्रकार निदर्शनास आला. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे मांजर्डे परिसर हादरून गेला आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, मांजर्डे येथील बसस्थानक चौकात रविवारी सकाळी व्यायामासाठी जाणाऱया ग्रामस्थांना दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्या डोक्यात अज्ञातांनी दगड घालून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. यापैकी तानाजी शिंदे यांचा मृतदेह बसस्टँडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला तर अजित साळुंखे यांचा मृतदेह बसस्थानकापासून उत्तरेला 50 फूट अंतरावर रस्त्यालगत आढळून आला. दोन्ही मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले दोन मोठे दगड आढळून आले आहेत. डोक्यात जबर मार लागल्यामुळे रक्ताचा सडा पडला होता.
मांजर्डे हातनूर रस्त्यालगत लगत असणारा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. रात्रीच्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे भटक्या कुत्र्यानी मृतदेहाच्या डोक्याच्या भागाचे लचके तोडल्यामुळे डोक्याचा अर्धा भाग सापडला नाही. दोघांच्याही डोक्यात मोठे दगड घालून एकाच पद्धतीने खून करण्यात आला आहे. खुनासाठी वापरलेले रक्ताने माखलेले दगड घटनास्थळी पडले होते. तसेच बसस्थानकाच्या भिंतीवर व मांजर्डे हातनूर रोडलगत रक्ताचे डाग आढळून आले आहेत. सदरची घटना शनिवारी मध्यरात्री नंतर घडली असावी. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून तेथे पडलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या यासह मृत् देहाजवळील रक्ताचे नमुने पुढील तपासासाठी घेण्यात आले आहेत. या घटनेतील दोन्हीही व्यक्ती व्यसनाधीन होत्या. यातील शिंदे हे 6.00 च्या सुमारास दारूच्या दुकानांतून दारू घेऊन येताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आढळून आले आहेत. तर अजित साळुंखें हे रात्री नऊ वाजता त्याच ठिकाणी दारू पिऊन पडल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. संशयित म्हणून मांजर्डे व आरवडे येथील काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
सकाळपासून पोलिसाचा तपास सुरू आहे. मांजर्डे व आरवडे गावात पोलिस तपासासाठी तैनात करण्यात आले होते. तर रात्री घटना घडल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये संशयित आरोपी व्यवस्थित दिसत नाही. मात्र आरोपी खून करून मांजर्डे आरवडेच्या दिशेने गेल्याचा पोलिसांना शंका आहे. दोन्ही मृत हे व्यसनाधीन असल्यामुळे व कुटूंबियांचे कोणावर संशय नाही त्यामुळे पोलीसा समोर तपासाचे मोठे आव्हान आहे. सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक सजीव झाडे, उपनिरीक्षक केराम, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार, बिट अंमलदार माने, जोतिराम पवार यांनी भेट दिली. तपास तासगाव पोलिस करीत आहेत.
मृत दोहोंच्या खुनाचे कारण काय?घटनेमध्ये अजून कोण सहभागी होते का? दोन्हीं खुनाचा एकमेकाशी संबंध काय? सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत. घटनास्थळापासून जवळ असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.








