प्रभाग सोळा पोटनिवडणूक : ३४ केंद्रावर मतदानाची सोय : २०७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती : कडक पोलीस बंदोबस्त
सांगली /प्रतिनिधी
महापालिकेच्या प्रभाग १६ -अ मधील पोटणीवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. यासाठी ३४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई आणि १ पोलीस कर्मचारी अशा २०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे चोख नियोजन केले आहे. आज स्टेशन चौकातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या आवारातून सर्व मतदान केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या साहित्यासह रवाना झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १६ अ च्या रिक्त जागेच्या पोटनिवडणूकसाठी मंगळवार १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. प्रभागात २४ हजार ३९० इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार १२ हजार १२८ तर स्त्री मतदार १२ हजार २६२ आहेत. मतमोजणी बुधवार १९ रोजी होणार आहे.