अनाधिकृतपणे कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा
प्रतिनिधी / सांगली
पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी वेळेत पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. अनाधिकृतपणे सिंचन योजनेच्या कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांच्या कामाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरुगडे, श्रीमती ज्योती देवकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.