सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
वार्ताहर / कसबे डिग्रज
कर्नाळ नावरसवाडी मार्गावरील नावरसवाडी जवळच्या पूलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे पुर्णतः तुटलेले आहेत. नावरसवाडी नजीकच्या पुलाच्या संरक्षक पाईप गतकाळातील महापुराच्या पाण्याने वाहून गेल्या आहेत. यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे वाहनधारकांसाठी धोकादायक बनले आहे.

महापुरातील पाण्याच्या गतीमुळे दोन्ही बाजूचे संरक्षक पाईप वाहून गेली असता यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून चक्क काठ्या वापरल्या आहेत. महापूर येऊन अनेक महिने होऊन गेल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. या मार्गावर वाहनाची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पूलाची दुरावस्था होऊन सुद्धा काहीच हालचाल होताना दिसत नाही. पूलाची दुरुस्ती कधी होणार असा सूर वाहनधारकांकडून आळवला जात आहे.








