लक्ष्मण नवलाई; महापौर सूर्यवंशी यांना इशारा
प्रतिनिधी / सांगली :
प्रभाग क्रमांक १७ मधील मंगलमूर्ती कॉलनी येथील ड्रेनेजचे काम माझ्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले आहे. प्रभागात कधी फिरकूनही न पाहणाऱ्या महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी या कामाचे श्रेय घेऊ नये. अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य लक्ष्मण नवलाई यांनी दिला आहे. हिम्मत असेल तर गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची यादी महापौरांनी जाहीर करावी, असे आव्हानही नवलाई यांनी दिले आहे.
याबाबत बोलताना नवलाई म्हणाले, प्रभाग क्रमांक १७ मध्ये मंगलमूर्ती कॉलनी गल्ली नंबर २ येथील त्रिमूर्ती पोलीस चौकी पासून शंभर फुटी रोड च्या ड्रेनेजच्या मेन लाईन ला जोडण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. गेले अडीच वर्षे या कामासाठी महापालिका आयुक्त, ड्रेनेज विभागाचे तेजस शहा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कुलकर्णी, तात्कालीन अधिकारी सुनील पाटील, एस. एस.पाटील, एम.एन पाटील व एसएमसीचे संकपाळ या सर्वांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला.
हे काम सुरू करण्यासाठी एसएमसीला काही अडचणी होत्या. शामराव नगर येथे भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात चालू असल्यामुळे तेथे पोकलँण्ड चे काम चालू होते. त्यामुळे मंगलमूर्तीच्या कामावरती लवकर पोकलॅण्ड मिळत नव्हता. त्याबाबत पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे काम चालू झालेआहे. पण मंगलमूर्ती कॉलनी कडे कधीही न फिरकणार्या महापौर सूर्यवंशी यांनी या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्त, नागरिकांची ते दिशाभूल करत आहेत. त्यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.