प्रतिनिधी / जत
ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर त्यांच्या मदतीला जाणे ही काय चूक असू शकते का ? असा सवाल करून जर सरकारच पोलिसांना मनमानी करण्यासाठी मुभा देत असेल तर ते चुकीचे आहे, यामुळे उद्या पोलीस कुणावरही चांगल्या व्यक्तीवर 353 चे कलम लावून पोलीस नाहक त्रास देतील, त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सारख्या चांगल्या मंत्र्यांनी अशी नवी प्रथा वेळीच रोखली पाहिजे, असे परखड मत भाजप नेते तथा माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.
जगताप म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मागची पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चांगला व सक्षम कारभार केला आहे, यापूर्वी त्यांनी विरोधी पक्ष नेते आणि आज विरोधी पक्षनेते म्हणून देखील चांगली भूमिका घेऊन राज्याच्या हितासाठी काम करत आहेत, राज्य चालवण्याचा त्यांनाही चांगला अनुभव आहे, चांगल्या वाईट गोष्टी त्यांना समजतात.
त्यामुळे ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या मदतीला जाणे यात गैर काय आहे. परंतु याबाबतीत विनाकारण राजकारण आणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न होत आहे. काही राजकिय मंडळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतात हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. आज लोकप्रतिनिधी एखाद्या व्यक्तीला विनाकारण पोलिसांनी ताब्यात घेतले तर मदतीला जातात, तेथील वस्तुस्थिती जाणून घेतात, याचा अर्थ शासकीय कामात अडथळा आणले असे होत नाही. आणि जर प्रत्येकाला असेच करणार असेल तर हा नवा पायंडा पडेल, उद्या पोलीस कुणालाही उचलून 353 चा धाक दाखवून मनमानी करतील.
त्यामुळे मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती करतो, देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या व्यक्ती बद्दल असे चुकीचे निर्णय, राजकारण होऊ नये, यामुळे चुकीचा पायंडा राज्यात पडेल, शिवाय देवेंद्र फडणवीस यांना राज्य चालवण्याचा अधिकार आणि अनुभव आहे, अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करतो म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.