लसीअभावी वेग मंदावला ः आतापर्यंत फक्त सहा लाख लोकांना लसीकरण ः पाच लाखांवर लोक दुसऱ्या लसीच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून लसीकरण सुरू झाले असले तरी आतापर्यंत फक्त सहा लाख लोकांनाच लसीकरण करण्यात आले आहे. ही टक्केवारी फक्त 20 टक्के आहे. पाच लाख दहा हजार लोकांना पहिला तर 70 हजारांवर लोकांना दुसरा डोस दिला आहे. पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य, फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरण केले. दुसऱ्या टप्यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधीग्रस्तांना लस देण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील नागरिकांना लस दिली. जिल्ह्यात सहा लाखांवर ही संख्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र, मनपा दवाखाने, खासगी दवाखाने, आदी 227 केंद्रावरून लसीकरण सुरु आहे. मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण वारंवार ठप्प होत आहे.
जिल्ह्यातील दररोज किमान 25 ते 30 हजार लसीची गरज आहे. मात्र 15 ते 20 हजारच लस उपलब्ध होते. मागणीनुसार लस येत नसल्याने अडथळा येत असून केंद्र लसीकरणाअभावी बंद राहत आहेत. गेल्या आठवड्यात तर तब्बल पाच दिवस केंद्र बंद होती. बुधवारी 18400 डोस आले. गुरूवारी सायंकाळी ती लस संपली यामुळे अनेक केंद्रावर लसीकरण पुन्हा बंद झाले आहे.
ऑनलाईन नोंदणी बंद केली
|
गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार लस उपलब्ध होईल तसे संबधितांना संपर्क करून लसीकरणासाठी बोलविले जात होते. मात्र काही दिवसापासून नियमित लस येत नसल्याने नोंदणीचा आकडा वाढला आहे. शिवाय नोंदणी केलेल्यांकडून वारंवार विचारणा केली जात असल्याने ही नोंदणीच बंद केली आहे.
18 ते 44 पर्यंत लसी कधी?
45 वर्षावरील लोकांचे लसीकरण अद्याप संपले नाही. तरीही 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. 1 मेपासून या गटाचे लसीकरण सुरू होणार होते. यासाठीची ऑनलाईन नोंदणीही सुरू केली होती. काहींनी लस घेतली मात्र लसीचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने हा निर्णय थांबविला असून त्यांचे लसीकरण कधीपासून सुरू होणार हेही स्पष्ट केले नाही. त्यामुळे या गटातील लसीसाठी प्रतिक्षेतच आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेले लसीकरण
वयोगट पहिला डोस दुसरा डोस एकूण
आरोग्य कर्मचारी 26190 15450 41349
फ्रंटलाईन वर्कर्स 25035 8431 33466
ज्येष्ठ नागरिक 221080 29714 259449
45 वयोगटावरील 211080 12633 233713
18 ते 45 वयोगट 4602 0000 4302








