प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या सर्दी, ताप व इतर कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या संशयित बाहयरुग्णांची माहिती पंचायत समिती यंत्रणेकडून घेतली जात आहे. त्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. या बाहय रुग्णांची दैनंदिन माहिती जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांच्या कडून घेतले जात आहे. संबंधीत डॉक्टरांनी ही माहिती लपवल्यास कारवाई होणार असल्याची माहिती, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.
शिंदे पुढे म्हणाले, वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरांकडून गुगल लिंकच्या माध्यमातून बाहयरुग्णांची माहिती घेतली जात आहे. या माहिती मध्ये येणाऱ्या दैनंदिन कोविड सदृष्य, सारी, इन्फलुजा, आजाराची लक्षणे असणाऱ्या बाहयरुग्णांची माहिती भरण्यासाठी गुगल स्प्रेड शिट देण्यात आली आहे. सदरची माहिती दररोज भरणे संदर्भात सूचना दिल्या असून त्याचे नियंत्रण तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत केले जात आहे. खाजगी डॉक्टरांनी भरलेली माहिती जिल्हास्तरावर एकत्रित केली जात आहे. रोज सायंकाळी ती माहिती तालुकास्तरावर प्राप्त होते.
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्या रुग्णांची कोविड टेस्ट केली जाते. त्यामुळे वेळीच रुग्णावर उपचार होवून रुग्णाच्याजीवास धोका टाळता येतो.तालुक्यातील ज्या खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनास सदर बाहय रुग्णांची माहिती लपवल्यास अथवा माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास व सबंधित रुग्णास नजिकच्या आरोग्य संस्थेकडे तपासणी करण्याकरता नेले नसल्याचे निदर्शनास आल्यास व रुग्णांचा मुत्यु झाल्यास सबंधित डॉक्टरांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अन्वये कायदेशीर कारवाई होणार आहे. तरी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








