प्रतिनिधी / सांगली
कडेगाव (जि. सांगली) पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत निरीक्षकाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)कडे सोपविण्याची सुचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
निरीक्षक हसबणीस याने मुलीची ओळख काढून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने बळजबरी करून लैंगिक अत्याचार व बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन दूरध्वनीवरून चर्चा करून हा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडे देण्याची सूचना केली आहे. तसेच २० दिवस होऊनही सदर आरोपीस अद्याप अटक झाली नाही. याबाबत खेददेखील गृहमंत्री देशमुख यांच्याकडे व्यक्त केला आहे.
सदर आरोपी हा पोलीस निरीक्षक म्हणून कडेगाव पोलिस स्टेशन येथे इन्चार्ज आहे. त्यामुळे सदर तपासामध्ये चालढकल होत आहे व आरोपीस अद्याप अटक केलेली नाही. आरोपीस अटक न केल्यामुळे आरोपी हा पीडित मुलीस विविध प्रकारचे आमिषे व दमबाजी करीत असल्याचे पीडित मुलीने डॉ.गोऱ्हे यांच्याकडे तक्रार दिल्याचे देखील गृहमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. यामुळे तपास अधिकारी व तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या प्रकरणात आरोपीस तात्काळ अटक करावी. आरोपीच्या शासकीय निवासस्थानातील आवश्यक पुरावे गोळा करावेत. आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासावेत. आरोपी ने पाठवलेले व्हाट्सअप मेसेजेस व फोनवरील संभाषण पुरावे म्हणून गोळा करावेत. सदर तपास हा उपअधीक्षक इस्लामपूर यांचे कडून काढून राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात यावा.
दि. १५ सप्टेंबर २०२० रोजी सांगली जिल्हा शिवसेना महिला आघाडी यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा शिवसेनेच्यावतीने स्थानिक पातळीवर शिवसेना माजी महिला जिल्हाप्रमुख तथा स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या सुनीता मोरे या करत आहेत.








