सांगली : प्रतिनिधी
सांगली ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सांगली एसटी आगाराने नवे बसस्थानक उभारले आहे. या स्थानकाचे औपचारिक उदघाटन सोमवार 3 रोजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते पार पडले.
सांगली मुख्य स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे फ़क्त कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सांगली आगारात वेगळे बसस्थानक उभारण्यात आले आहे. एसटी स्थानकातील पार्सल ऑफिस जवळ हे नवे स्थानक झाले आहे. यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता अरुण वाघाटे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक धनाजीराव घाटगे, कनिष्ठ व्यवस्थापक दीपक हेतंबे, हॉटेल असोसिएशनचे शैलेश पवार, लेखाकार आर. डी. पाटील, सहायक कार्यशाळा अधीक्षक प्रविण कोळी, यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक व प्रवासी उपस्थित होते.
या नव्या स्थानकावर प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून, कोल्हापूरसाठी दिवसाकाठी 11 गाड्यांच्या 33 फेऱ्या सुरू आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर हे स्थानक सुरू करण्यात आले असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इचलकरंजी मार्गावर ही प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.