विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील सवाल : जादाचे पैसे चेकने परत केले
शासनाच्या आदेशाबाबतची संदिग्धता दूर न झाल्याने गोंधळ
प्रतिनिधी / विटा
बिलांच्या नियमांबाबत आमच्याच नव्हे तर इतर कोविड सेंटर मध्येही गोंधळाची स्थिती आहे. कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही लावा, म्हणजे नेमके काय चालते ते तरी सगळ्यांना कळेल, अशी मागणी होत आहे. मात्र यावर कोणी काही बोलायला तयार नाही. अगदीच जर तुम्ही सज्जन असाल तर सगळीकडचेच ऑडिट करूया. एकट्या जीवनधाराचेच का?, असा सवाल करत आमच्या कोविड सेंटरमध्ये जर काही बिलाबाबत तक्रार असेल तर आज पर्यंतच्या सगळ्या रुग्णांचे पैसे एकटा वैभव पाटील भरायला तयार आहे, असे आव्हान माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिले.
येथील पालिकेच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जीवनधारा डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांकडून ११ लाख ८४ हजार रुपयांची जादा आकारणी झाल्याचा आक्षेप घेत ती रक्कम संबंधित रुग्णांना परत करावी, असे आदेश तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी बुधवारी दिले आहेत. याबाबत विटा पालिकेचे पक्ष प्रतोद वैभव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
कोविड केअर सेंटरमध्ये पूर्ण वेळ ऑडिटर बसवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पण तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी बसवला नाही. कोणत्या बेडला कोणती बिल आकारणी करावी?, अशी कोणतीही सूचना त्यांनी दिलेली नाही. या बाबतच्या शासनाच्या आदेशाबाबतची संदिग्धता दूर करण्याचे काम झाले नाही, असा आक्षेप व्यक्त करीत ऑडिट झाल्यानंतर रुग्णांचे अतिरिक्त झालेले बिलाचे पैसे चेक ने परत कोविड केयर सेंटर च्या प्रशासनाने दिले आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष पाटील यांनी दिली.