कुपवाड / प्रतिनिधी
सांगलीतील फिनिक्स स्पोर्ट्स अँड कल्चरल अॅक्टिव्हिटी फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा यंदाचा राष्ट्रीय क्रीडा संघटक पुरस्कार युनिकॉन ग्रुपचे उद्योजक विजय भगत यांना मिळाला आहे. विविध मान्यवरांच्याहस्ते पुरस्काराने भगत यांना सन्मानित करण्यात आले.
फिनिक्स स्पोर्ट्स अँड कल्चरल अॅक्टिव्हिटी फाउंडेशन या अंतर्गत मोंटॅक्स क्रिकेट असोसिएशन स्थापन झाल्यापासून जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून जवळपास तीन हजार खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत. त्यापैकी जवळपास ८० खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत. सांगली जिल्हा मोंटेक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आतापर्यंत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय अशा विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. यावेळी बोलताना विजय भगत यांनी मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय क्रिकेट असोसिएशनचे सचिव अमोल कदम व सर्व संचालक मंडळ, प्रशिक्षक, सर्व खेळाडूंना दिले. यावेळी ओंकार शुक्ल, विनायक ऐनापुरे, महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांसह विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी, क्रीडाशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.









