वार्ताहर / आष्टा
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाट्याजवळ शुक्रवारी रात्री मृतावस्थेतील बिबट्या सापडला. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इटकरे गावातून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावर मृतावस्थेत बिबट्या पडला होता. ही घटना महामार्गावर नियमितपणे गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाला कळविली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या परिसरात बिबट्या दृष्टीस पडला होता. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात तपासणी केली असता त्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले होते. ठशावरून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे हे निश्चित झाले होते. बिबट्याचे अस्तित्व असल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते.
शुक्रवारी रात्री बिबट्या मृतावस्थेत सापडला. या बिबट्याच्या मृत्युचे कारण समजले नसले तरी अज्ञात वाहनाच्या धडकेत याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही एकदा याच परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या घटनेला उजाळा मिळाला. घटनास्थळी प्रवाशांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.








