प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होत नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी तात्काळ ऑक्सिजनसह १०० बेडच्या कोविड हॉस्पिटलला मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याशी चर्चा करून आटपाडीतील शंभर बेडच्या कोविड हॉस्पिटलची गरज आमदार पडळकर यांनी मांडली. त्याचवेळी सदर हॉस्पिटलसाठी आपला निधी देण्यासह सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
आटपाडी तालुक्यात रविवारी तब्बल १७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दररोज अशाच पद्धतीने वाढ होत आहे. कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, दोन कोविड हॉस्पिटल याद्वारे फक्त ११० बेड आटपाडी तालुक्यात उपलब्ध आहेत. ते सर्व अपुरे असून तात्काळ शंभर ऑक्सिजन बेडची गरज आहे. श्री सेवा आयसीयुने हे कोविड सेंटर चालविण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून तात्काळ मान्यता देतो, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.