पोलीसांच्या गृहप्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणारः गुन्हेगारी टोळ्यांच्याविरोधात मोक्काच्या कारवाई करणार
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात चोरी-छुप्या पध्दतीने जे अवैद्य धंदे सुरू असतील ते मोडून काढण्यात येतील. जिल्ह्याततील पोलीसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे. असे नूतन पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी पदभार स्विकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेडाम यांनी 41 वे पोलीस अधीक्षक म्हणून सांगलीचा पदभार सोमवारी स्विकारला. मावळते पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्विकारला. दोनच दिवसापुर्वी गेडाम यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकपदाचा पदभार सोडला होता.
गेडाम म्हणाले, जिल्ह्यात जर चोरी छुपे अवैद्य धंदे सुरू असतील ते मोडून काढण्यात येतील. तसेच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी टोळीच्याविरोधात मोक्का कायद्याचा प्रभावीपणे अंमल केला जाईल. सामान्यांच्यासाठी पोलीस सदैव तयार असतील. शहरातील अनेक समस्या या गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असतात त्यामुळे या समस्या संपविण्यासाठी आणि योग्य असे पोलिसिंग केल्यास निश्चित गुन्हेगारी कमी होवू शकते. ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल.
जिल्ह्यातील पोलीसांच्यासाठी चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी त्यांना गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे. हे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही शासनाकडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस दल एक होवून कार्यरत असणार आहे. कोठेही सामान्य व्यक्तीला त्रास झाल्यास त्याच्या पाठीशी पोलीस खंबीरपणे उभे राहतील. तसेच कोणतेही नवीन पथक न निर्माण करता आपण आहे त्या पोलीस दलाच्या पथकाच्या माध्यमातूनच काम सुरू ठेवणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
खासगी सावकारांच्याविरोधात कारवाई करण्यासाठीही आपण मागे पुढे पाहणार नाही. जिल्ह्यातील खासगी सावकारांची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर ज्या लोकांना खासगी सावकारांचा त्रास झाला आहे त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कायद्याव्दारेच या सावकारांना चाप लावला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेडाम यांचे मुळगाव नागपूर हे आहे. ते 2012 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कामाची सुरवात जालना येथे उपअधीक्षक म्हणून केली त्यानंतर ते बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. 29 एप्रिल 2017 रोजी त्यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली त्याठिकाणी त्यांनी साडेतीन वर्षांत अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले तसेच शिक्षेचे प्रमाण वाढले. संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवली. पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प साकारला. अतिशय चांगले काम करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता निर्माण केली.








