मणेराजूरी / प्रतिनिधी
मणेराजूरीसह तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीचे हजारो कोटींचे नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पंचनामे सुरु झाले असून येत्या दहा दिवसात सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश आले आहेत.
मणेराजूरीत तलाठी सागर चव्हाण; ग्रामसेवक महादेव जाधव; कृषी सहायक आर. बी. महिंद्रकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बागेत जावून पंचनामे सुरू केले. आजपासून अधिकाऱ्यांच्या तीन ते पाच ग्रुप ( टीमा ) करून पंचनामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यापासून अवकाळी पडलेल्या पावसाने ज्या द्राक्षबागाचे घडकुज, तर पक्व द्राक्ष घडातील मण्याला तडे गेलेल्या बागांचे पंचनामे सुरु आहेत. ज्या बागामध्ये चाळीस टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्या बागांचे पंचनामे अग्रक्रमाने करणेत येणार आहे; मण्याला तडे, घडकुज, मणीगळ, दावण्या या रोगाने द्राक्षबागांची माती झाली असून चालू वर्षाचा द्राक्षबागांचा हंगामच धोक्यात आहे.
चालू वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये फळ छाटणी असलेल्या द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून तर सप्टेंबरमध्ये फळ छाटणी घेतलेल्या बागांमध्ये मण्याला तडे गेले आहेत. गतवर्षी खराब हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी जरा उशीरा छाटणी केली. पण यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच महिन्यात फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांनाच याचा मोठा फटका बसला आहे. पंचनामे पूर्ण करून तातडीने मोठी मदत शासनाने द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.