सहा कर्मचाऱयांची नियुक्ती : विविध योजना राबविण्यासाठी घेतला जातो आधार
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. योजना राबविण्याकरिता जनगणतीचा आधार घेतला जातो. जनगणती आणि परिसराची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयांकडून जमा केली जाते. अर्बन प्रेम सर्व्हे या अंतर्गत सध्या शहरात सर्वेक्षण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. घरोघरी जावून कुटुंबातील सदस्यांची संख्या जाणून घेण्यात येत आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय 1950 पासून कार्यरत आहे. सांख्यिकी विभागाच्या सर्वेक्षणानुसार घेतलेल्या माहितीच्या आधारे केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना, विकासकामे आणि धोरणे ठरविण्यात येतात. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने केलेल्या नमुना सर्वेक्षणाच्या चौकटीच्या आधारे योजनांचे नियोजन व अंमलबजावणी केली जाते. याकरिता शहरांची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या प्रथम श्रेणीतील घटक मानली जाते. नमुना सर्वेक्षणाच्या तंत्रानुसार शहराचे घटक भाग एकक म्हणून वापरले जाते. सन 1959-63 मध्ये शहरी प्रेम सर्व्हे या नावाखाली हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. प्रेम सर्व्हे तयार करण्यासाठी एका ब्लॉककरिता 200 कुटुंबांतील सदस्यांची संख्या निश्चित केली जाते.
पहिल्या सर्वेक्षणातील उपलब्ध माहितीच्या आधारावर 1972 पासून सतत सुरू असलेले सर्वेक्षण स्वीकारले गेले आहे. सध्याचे सर्वेक्षण 2017-22 टप्प्यासाठी सुरू आहे. आधी केलेल्या ब्लॉकच्या आधारे इमारती आणि कुटुंबांची संख्या संकलित केली जाणार आहे. जेव्हा कोणत्याही ब्लॉकच्या सीमा निश्चित नसल्यास त्यावेळी नवीन ब्लॉक तयार करण्यात येतात. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षण माहितीचा वापर भारतात आणि परदेशातील अनेक संस्था करीत आल्या आहेत. देशातील गरिबांची माहिती, कौटुंबिक गरजा, राहणीमान, रोजगार, बेरोजगारीची स्थिती आणि शेतकरी स्थिती याची माहिती घेतली जाते.
सहकार्य करण्याचे आवाहन
सध्या याअंतर्गत शहरी प्रेम सर्व्हेचे काम सुरू आहे. याकरिता सांख्यिकी विभागाने 6 कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये ब्लॉकनुसार सर्वेक्षण करण्यात येत आहे. घरोघरी जावून कुटुंबातील सदस्यांची संख्या जाणून घेण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डनिहाय माहिती घेऊन प्रेम सर्व्हे करण्यात येत आहे. लक्ष्मण बस्तवाड, यशवंत लमाणी, रवी बजंत्री, शिवमूर्ती नाईक, मंजुनाथ आगसर, मल्लिकार्जुन गौडा पाटील, रवी हळेमनी या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरवासियांनी या कर्मचाऱयांच्या नावाची ओळखपत्राद्वारे खातरजमा करून आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









