वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना व लॉकडाऊनमुळे देशभरात 23 मार्चपासून सर्व उद्यागेधंदे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांच्या वाहनांची खरेदी आणि विक्री ठप्प झाली आहे. यामुळे या क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज तज्ञांकडून मांडला जात आहे. वाहन क्षेत्रासह अन्य कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तिसऱया सत्रातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात मार्गदर्शक सुचनांच्या आधारे उद्योगधंदे सुरु करण्यास हिरवा कंदील दिला आहे. याचाच भाग म्हणून देशातील दिग्गज वाहन निर्मितीमधील कंपनी मारुती सुझुकीने आपल्या 600 शोरुम्सचे शटर उघडत विक्रीचा पुन्हा प्रारंभ केला आहे.
आगामी काळात कोरोना संकटासोबत आर्थिक संकटाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे सदर कंपन्यांनी आपला व्यवसाय काळजी घेत सुरु केला आहे. मारुतीच्या जवळपास 55 कार्सची डिलिवरी देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना कंपनीच्या वेबसाईटवरही आपल्याला हव्या असणाऱया वाहनांचे बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेताना ग्राहकांना आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईनच जमा करावी लागणार आहेत. त्यानंतरच ग्राहकांना आपल्या जवळच्या डिलरकडून वाहन मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
600 शोरुम्स सुरू
मारुती सुझुकीची देशभरात 1,964 गावात आणि शहरामध्ये 3,086 शोरुम्स कार्यरत आहेत. परंतु यातील फक्त 600 शोरुम्स सुरु करण्यात आली असून अन्य ठिकाणची शोरुम्स लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.









