एकूण 1 कोटीची मदत, पंजाब, हरियाणा राज्य हॉकी संघटनांचाही मदतीचा हात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका भारतातील क्रीडा क्षेत्रालाही मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. या कठीण काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱया व्यक्तींना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जण पंतप्रधान व राज्य सरकारच्या सहायतानिधीला मदत करत आहे. हॉकी इंडियानेही बुधवारी कोरोनाविरुद्ध लढय़ात पंतप्रधान सहायता निधीला 25 लाखांची रक्कम जाहीर केली होती. यानंतर, शनिवारी पुन्हा हॉकी इंडियाने आणखी 75 लाख अशी एकूण 1 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
‘सध्याच्या खडतर काळात प्रत्येकाने पुढे येत मदत करणे अपेक्षित आहे. हॉकी इंडियाच्या संचालक मंडळाने पंतप्रधान सहायता निधीला एक कोटी रुपयांचा निधी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाने आतापर्यंत हॉकीला आणि हॉकीपटूंना खूप पेम दिले आहे. यामुळे देशासाठी आणि नागरिकांसाठी जे काही करता येणे शक्य आहे ते आम्ही करत आहोत, अशा शब्दात हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी भावना मांडल्या.
देशाच्या कठीण काळात हॉकी इंडियाचा नेहमी पुढाकार राहिला असल्याचे हॉकी इंडियाचे महासचिव राजिंदर सिंग यांनी सांगितले. प्रथम आम्ही 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. पण, संचालक मंडळाच्या एकमतानुसार आम्ही आणखी 75 लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचेही सिंग यांनी सांगितले. याशिवाय, हरियाणा, पंजाब या राज्यांनी पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली असल्याचे हॉकी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नॉर्मन यांनी स्पष्ट केले. तसेच मध्य प्रदेश व ओडिशा राज्याच्या संघटनेने यापूर्वीच दोन लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या या लढाईत देशातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही नॉर्मन यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, हॉकी इंडियासह देशातील अन्य क्रीडा संघटनांनी देखील पीएम केअर फंडासाठी आपले योगदान दिले आहे. बीसीसीआयने सर्वाधिक 51 कोटी रुपयांचा निधी दिला असून भारतीय फुटबॉल महासंघाने 25 लाख, मुंबई क्रिकेट संघटनेने 50 लाख, मोहन बगान फुटबॉल क्लबने 30 लाख रुपये दिले आहेत.









