जिल्हा बँकेतील 1474 तर इतर बँकातील 4500 शेतकऱ्यांचा समावेश
दोन लाखांवरील कर्जमाफी झाली नसल्याचा परिणाम
कर्जमाफीचा शासनाकडून अद्यादेश नाही
थकीत कर्जामुळे नवीन कर्जाची उचल नाही
कृष्णात चौगले / कोल्हापूर
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या 99 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पण दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या कर्जमाफीसाठी शासनाने अद्यादेश काढलेला नाही. अनेक मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील थकबाकीची रक्कम भरली असली तरी कर्जमाफीची रक्कम मिळाल्याशिवाय बँकांकडून नवीन कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे जिह्यातील 5 हजार 974 शेतकऱयांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यांची अर्थिक कोंडी झाली आहे.
हळूहळू लॉकडाऊन शिथिल होत असले तरी अद्याप राज्याची अर्थिक घडी सुरळीत झालेली नाही. जीएसटीपोटी जमा झालेल्या रकमेचा परतावा केंद शासनाकडून राज्य सरकारला मिळाला नसल्यामुळे अर्थिक टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे दोन लाखांवरील कर्जमाफीची घोषणा करूनही त्याबाबतचा अद्यादेश काढून अंमलबजावणी झालेली नाही. दोन लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच दोन लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाने यापूर्वीच घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. 30 जूनपर्यंत नियमित कर्जाची पूर्णफेड केली, तर त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये व ज्यांची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी वरील रक्कम 30 जूनपर्यंत भरल्यास त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. पण दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत कोणताही अद्यादेश काढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह बँकाही संभ्रमात आहेत. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत दोन लाखांवरील थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी भरली आहे. तरीही कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याशिवाय नवीन कर्ज देण्यासाठी बॅंकांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी अर्थिक अरिष्ठात सापडला आहे. जिल्ह्यात 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेले 5 हजार 974 शेतकरी आहेत. यामध्ये 1 हजार 474 शेतकरी जिल्हा बँकेतील असून त्यांची 29.43 कोटींची थकबाकी आहे. तर इतर बँकांकडे 4 हजार 500 शेतकरी थकबाकीदार आहेत.
99 टक्के शेतकऱ्यांना लाभ
राज्यातील सुमारे 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा झाले होते. पण ज्या गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका सुरू होत्या, तेथे आचारसंहितेमुळे कर्जमाफीची रक्कम जमा करता आली नाही. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अर्थिक टंचाईमुळे 11 लाख शेतकऱयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया प्रलंबित राहिली. यामध्ये जिह्यातील 7 हजार 904 शेतकऱ्यांचा समावेश होता. पण गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत 7 हजार 87 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून 817 शेतकरी अद्याप प्रतिक्षेत आहेत.
नवीन कर्ज वाटपाच्या आदेशाची गरज
दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी जूनअखेर वरील रक्कम भरली आहे, त्यांच्या उर्वरित कर्जाची जबाबदारी शासनाने घेऊन संबंधित शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचे बँकांना आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत
जिल्ह्यात 2 लाख 18 हजार 189 शेतकऱयांनी नियमित कर्ज परतफेड केले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. शासनाने केलेल्या घोषणेनुसार हे शेतकरी 50 हजार रूपयांच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
2 लाखांपेक्षा जास्त थकबाकीदार शेतकरी
बँक शेतकरी रक्कम (कोटीत)
जिल्हा बँक 1474 29.43
इतर बँका 4500 उपलब्ध नाही
नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी
बँक शेतकरी रक्कम (कोटीत)
जिल्हा बँक 1, 92000 1258
इतर बँका 26189 206
2 लाखापर्यंत थकबाकीदार शेतकरी
कर्जमाफीस पात्र शेतकरी 47,978
कर्जमाफी मिळालेले शेतकरी 47,161