पुलाची शिरोली / वार्ताहर
गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण करणार्या सहा चोरट्यांच्या टोळीस शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. युवराज अण्णाप्पा किल्लेदर ( वय १९, रा. गोकुळ शिरगाव एमआयडीसी ) सिद्धू अण्णाप्पा मेळवंकी ( १९, रा. धनगर गल्ली, तामगाव, ता. करवीर ) संदीप अर्जुन पाटील ( ३२ ) मल्लेश रावसाहेब येळगुडे ( २१, दोघेही रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत अन्य दोघे बाल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून शिरोली एमआयडीसी येथील क्रम ऑलॉय इंडस्ट्रीज व जयसिंगपूर येथील सुशांत फोटो स्टुडिओ येथील चोरीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : शिरोली एमआयडीसी येथील क्रम ऑलॉय इंडस्ट्रीज येथे अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकटून अॅल्युमिनियम इनगॉट, लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा व रोख रक्कम अशी दोन लाख एकेचाळीस हजार रुपयांचा माल लंपास केला होता. शिरोली पोलिसांनी याबाबत रितसर तक्रार नोंदवत तपास सुरू केला होता. पोलिस हवालदार समीर मुल्ला यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेला माल विकण्यासाठी काही तरुण पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या तरुणांकडून अधिक चौकशी केली असता जयसिंगपूर येथील फोटो स्टुडिओ मधून त्यांनी कॅमेरा व फ्लॅश लाईट चोरला असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून लॅपटॉप, दोन कॅमेरे, फ्लॅश लाईट, मोबाईल संच, चोरीच्या कामासाठी वापरलेला टेम्पो व मोटरसायकल असे दोन लाख ६३ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.
सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, अविनाश पवार, राजेंद्र घारगे, समीर मुल्ला, किशोर सूर्यवंशी, प्रकाश पाटील, संजय हुंबे, प्रवीण काळे, विनायक चौगुले, सतीश जंगम, सुनील गावडे, अमर वासुदेव, संजय कुंभार यांनी ही कारवाई केली.
Previous Articleआदिनाथ साखर कारखान्याची निवडणुक लढवणार : आमदार संजय शिंदे
Next Article ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?









