जिल्हा बँकेसह जिल्हय़ात 775 सहकारी संस्थांच्या होणार निवडणुका
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना प्रादुर्भावामुळे 18 मार्च 2020 पासून सलग चारवेळा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेऊन निवडणुकांवर आणलेली स्थगिती उठवली आहे. सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह जिल्हय़ातील 775 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्था व सहकारी बँकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे.
कोरोना संसर्गामुळे गेले वर्षभर सर्वच निवडणुका थांबल्या होत्या. कोरोना विषाणू आणि त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 18 मार्च 2020 रोजीच्या आदेशान्वये 17 जून 2020 पर्यंत तसेच 17 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये 16 सप्टेंबर 2020 पर्यंत तसेच 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
पाच वर्षांची मुदत संपूनही देशातील कोणत्याच निवडणुका झाल्या नाहीत. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होताच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्याचबरोबर काही राज्यांमधे विधान परिषद निवडणुकाही पार पडल्या. तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱयांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत विनंती केली होती. या सर्वांचा विचार करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे 16 जानेवारी 2021 चे आदेश रद्द करून ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत, त्या टप्प्यापासून शासनाच्या कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी, असे आदेश सहकार पणन व वस्त्राsद्योग विभाग यांच्यावतीने काढण्यात आले आहेत.
जिल्हय़ात एकूण 775 संस्था, सर्वात मोठी जिल्हा बँक
सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकूण 775 सहकारी संस्था आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षक पतसंस्था आदींचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे. कोरोनामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. आता या बँकेचीही निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









