ऑनलाईन टीम / पुणे :
भाजपा पुणे शहर सहकार आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांनी सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दांगट यांच्या नेतृत्वाखाली सहकार आयुक्त अनिल कवडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सहकार विभागातील विविध योजना, त्यांच्या मुदती, अडचणी यावर चर्चा करण्यात आली.
अनिल कवडे म्हणाले, पुणे शहरातील अनेक गृहरचना संस्था, बॅका, पतसंस्था यातील पदाधिकारी हे सामंजस्याने आणि एकोप्याने न राहता वादविवाद करीत असतात. हे वाद मिटविण्यासाठी सहकार विभाग अथवा कोर्ट कचेरी यांची मदत घेणे हा मार्ग नाही, हे सहकार क्षेत्रात येणा-या सर्वच सहकार तत्वावर चालणा-या संस्थाच्या पदाधिकारी, सभासदांनी लक्षात घेतले पाहिजे.
यासोबतच सर्व सहकारी संस्थामधील वादविवाद स्थानिक पातळीवरच मिटवले जावेत यासाठी स्थानिक पातळीवरीलच व्यवस्था लागली गेली पाहिजे आणि या भूमिकेत सहकार आघाडीच्या सर्व पदाधिका-यांनी नागरिक आणि सहकार विभाग या दोघांमधील दुवा म्हणुन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन दशरथ दांगट, उपाध्यक्ष गिरीश घोरपडे, अक्षयसिंह शितोळे, दिलीप पर्वतीकर, किशोर चौधरी, सरचिटणीस अजित देशपांडे, सदस्य बालाजी माने, ऋषिकेश रजावात, किरण उभे आदि मान्यवर उपस्थित होते.