कळंबे येथील घटना : वनविभागाने केली कारवाई
प्रतिनिधी/. सातारा
सातारा तालुक्यातील कळंबे, ता. सातारा येथील एकाने पाळलेला ससा कापून त्याचे मांस शिजवले. हा सर्व प्रकार करताना सातारा वनविभागाने सापळा रचून छापा टाकला असता आरोपी रंगेहाथ जाळय़ात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 16 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 28 रोजी वनक्षेत्रपाल सातारा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वनक्षेत्रपाल सातारा श्रीमती शीतल राठोड आपल्या पथकासह कळंबे येथे पोहचल्या. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी वनाधिकाऱयांनी यांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी तिथे आरोपी महेश बाळू चव्हाण रा. कळंबे त्याच्या राहत्या घराच्या परडय़ात वन्यप्राणी ससा याचे मांस कुकरमध्ये शिजवत होता त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी याने त्याच्या घरात ससा हा वन्यप्राणी अंदाजे दोन महिन्यांपासून पाळून ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पथकाने सशाचे मांस शिजवलेला कुकर,कोयता व सुरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 29 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 16 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक विश्वास भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनक्षेत्रपाल शीतल राठोड, वनपाल योगेश गावित, वनपाल सुहास भोसले, वनरक्षक संजय धोंडवड, राज मोसलगी, रणजित काकडे वनरक्षक, संतोष काळे, प्रशांत पडवळ, मारुती माने व रोहोट यांनी केली.








