कांगारुंना आघाडीवीरांच्या खराब फॉर्मची चिंता
अबु धाबी / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सलामीची लढत आज (शनिवार दि. 23) ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाणार असून दोन्ही संघ विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघासमोर आघाडीवीरांच्या खराब फॉर्मची मुख्य चिंता आहे. अगदी अलीकडे त्यांनी बांगलादेश, विंडीज, न्यूझीलंड, भारत व इंग्लंड या सर्व संघांविरुद्ध मालिका गमावल्या आहेत. पहिल्या पसंतीच्या बऱयाच खेळाडूंनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून सातत्याने अंग काढून घेतले, याचाही त्यांना फटका बसला. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 5 विजय व 13 पराभव अशी कामगिरी नोंदवली.
डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्म ही ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आली आहे. कर्णधार ऍरॉन फिंच गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर त्यातून सावरत संघात परतला असून त्याला पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती त्यांना बॅकफूटवर ढकलणारी आहे. उपकर्णधार पॅट कमिन्सने एप्रिलमधील पहिल्या आयपीएल टप्प्यानंतर व्यावसायिक क्रिकेट खेळलेले नाही. फिरकी गोलंदाजांविरुद्ध सातत्याने झगडावे लागते, हा देखील ऑस्ट्रेलियाच्या मार्गातील आणखी एक अडथळा असेल. यावर ते कितपत मार्ग काढू शकणार, हे आजच्या सलामी लढतीत स्पष्ट होईल.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम बहरात असून अगदी अलीकडे त्यांनी विंडीज, आयर्लंड, श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्या. तसेच येथील सराव सामन्यात देखील दमदार विजय संपादन केले आहेत. या संघात सुपरस्टार खेळाडू नसले तरी कर्णधार तेम्बा बवूमा, डी कॉक, मॅरक्रम व हेंड्रिक्स उत्तम योगदान देत आले आहेत. जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित शमसी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य अस्त्र असेल.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍस्टॉन ऍगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), केशव महाराज, क्विन्टॉन डी कॉक (उपकर्णधार), बियॉर्न फॉच्युईन, रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, मल्डर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.









