द. आफ्रिका 8 गडी राखून विजयी, मॅरक्रमचे विस्फोटक अर्धशतक
दुबई / वृत्तसंस्था
एडन मॅरक्रमने (26 चेंडूत नाबाद 51) झंझावाती, नाबाद अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजचा तब्बल 8 गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. विंडीजला निर्धारित 20 षटकात 8 बाद 143 धावांवर रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 18.2 षटकात केवळ 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. विंडीजचा हा साखळी फेरीतील सलग दुसरा पराभव ठरला असून यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे.
यापूर्वी, दक्षिण आफ्रिका व विंडीज या दोन्ही संघांना आपल्या सलामी लढतीत पराभव पत्करावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून तर इंग्लंडने विंडीजचा 6 गडी राखून फडशा पाडला होता. त्यामुळे, ही लढत दोन्ही संघांसाठी विशेष महत्त्वाची होती.
आता दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवार दि. 30 रोजी साखळी फेरीतील तिसऱया लढतीत श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल तर शुक्रवारी विंडीज-बांगलादेशचे संघ आमनेसामने भिडणार आहेत.
मंगळवारच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने इव्हिन लुईसच्या धडाकेबाज अर्धशतकानंतरही विंडीजला 8 बाद 143 अशा माफक धावसंख्येवर रोखण्यात यश प्राप्त केले. इव्हिनने 35 चेंडूत 56 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 3 चौकार व 6 षटकारांचा समावेश राहिला. नंतर मॅरक्रम (26 चेंडूत नाबाद 51), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन (51 चेंडूत नाबाद 43), रिझा हेन्ड्रिक्स (39) यांच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने 10 चेंडूंचा खेळ बाकी राखत सहज विजय संपादन केला.
वास्तविक, विजयासाठी 144 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार तेम्बा बवूमा (2) धावचीत होत परतल्याने दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली होती. पण, क्विन्टॉन डी कॉकने माघार घेतली असल्याने संधी लाभलेल्या हेन्ड्रिक्सने 30 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी साकारली. त्याने व्हान डेर डय़ुसेनसह दुसऱया गडय़ासाठी 57 धावांची भागीदारी साकारली.
हेन्ड्रिक्स बाद झाल्यानंतर व्हान डय़ुसेन व मॅरक्रम यांनी दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेले. विजयासाठी 6 षटकात 44 धावांची आवश्यकता असताना या जोडीने त्या दिशेने मार्गोत्क्रमण केले. एकीकडे, डय़ुसेनने एक बाजू लावून धरली तर दुसरीकडे, मॅरक्रमने आक्रमक पवित्र्यावर भर दिला. मॅरक्रमच्या धडाकेबाज खेळीत 2 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला.
विंडीजच्या डावात इव्हिनची फटकेबाजी
तत्पूर्वी, विंडीजने 8 बाद 143 धावा केल्या, त्यात इव्हिन लुईसची 35 चेंडूतील 56 धावांची खेळी लक्षवेधी ठरली होती. लुईस व लेंडॉन्स सिमन्स यांनी 63 चेंडूत 73 धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर विंडीजच्या डावाला सुरुंग लागत गेला. दक्षिण आफ्रिकेतर्फे डेव्हॉन प्रिटोरियसने 17 धावात 3 बळी घेतले तर केशव महाराजने 24 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रबाडा व नोर्त्झे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज ः 20 षटकात 8 बाद 143 (इव्हिन लुईस 35 चेंडूत 3 चौकार, 6 षटकारांसह 56, केरॉन पोलार्ड 20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 26, लेंडल सिमॉन्स 16. डेव्हॉन प्रिटोरियस 2 षटकात 3-17, केशव महाराज 4 षटकात 2-24, कॅगिसो रबाडा, नोर्त्झे प्रत्येकी 1 बळी).
द. आफ्रिका ः 18.2 षटकात 2 बाद 144 (एडन मॅरक्रम 26 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 51, रॅसी व्हान डेर डय़ुसेन 51 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 43, रेझा हेन्ड्रिक्स 30 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 39. अकिल होसेन 4 षटकात 1-27).
क्विन्टॉन डी कॉकच्या माघारीमुळे आफ्रिकन गोटात खळबळ
सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अनेक संघ ब्लॅक लाईफ मॅटर्स अभियानाला एका गुडघ्यावर बसून आपले पाठबळ दर्शवत आले आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने विंडीजविरुद्ध लढतीपूर्वी आपल्या खेळाडूंना याबाबत सूचना केली होती. पण, यष्टीरक्षक-फलंदाज क्विन्टॉन डी कॉकने याला स्पष्टपणे नकार दिला आणि आपण सामन्यातून माघार घेत असल्याचेही जाहीर केले. त्याच्या या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकन गोटात खळबळ उडाली. संघव्यवस्थापनाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने नंतर जाहीर केले. क्विन्टॉन डी कॉकने आपण वैयक्तिक कारणास्तव खेळू शकणार नसल्याचे नमूद केले.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीपूर्वी देखील दक्षिण आफ्रिकन संघात सदर अभियानाला पाठिंबा दर्शवण्यावरुन एकमत नसल्याचे दिसून आले होते. जलद गोलंदाज ऍनरिच नोर्त्झे व यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेन यांनी हात पाठीमागे घेत केवळ उभे राहत यात सहभाग घेतला होता.









