जागतिक वातावरणाचा प्रभाव : निफ्टी 11,971.05 वर स्थिरावला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी भारतीय शेअर बाजाराने सलग दहाव्या दिवशीही आपली तेजीची घोडदौड कायम ठेवल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बुधवारी जागतिक बाजारातील तेजी आणि देशातील बाजारांनी चढउताराच्या वातावरणात मजबूत कामगिरी करीत सलगची तेजी कायम राखली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने जवळपास 600 पेक्षा अधिकचा टप्पा पार केला होता. परंतु अंतिम क्षणी सेन्सेक्स 169.23 अंकांनी वधारुन निर्देशांक 40,794.74 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.55 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 11,971.05 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बजाज फिनसर्व्हमध्ये सर्वाधिक चार टक्क्यांनी तेजीत राहिली आहे. सोबत बजाज फायनान्स, आयासीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, ऍक्सिस बँक, एचडीएफसी आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग तेजी नोंदवत बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, ओएनजीसी, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.
बीएसईचे बाजारमूल्य 160 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. यामध्ये 2,852 कंपन्यांचे समभाग वधारले तर 1,455 कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. 102 कंपन्यांचे समभाग एक वर्षाच्या उच्चांकावर राहिले तर 62 कंपन्यांचे समभाग वर्षभराच्या निम्या स्तरावर पोहोचले आहेत.
जागतिक पातळीवर प्रामुख्याने आशियातील बाजारात हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातील कोस्पी हे तेजीत राहिले होते. तर चीनचा शांघाय कंपोझिट आणि जपानचा निक्की हे घसरणीसह बंद झाले आहेत. युरोपियन बाजार प्रारंभीच्या काळात वधारले होते. याच दरम्यान कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात 0.09 टक्क्यांच्या घसरणीसह 42.41 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
विदेशी चलन बाजारात अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी वधारुन 73.31 च्या स्तरावर बंद झाला आहे.








