सेन्सेक्स 264 अंकांनी घसरला : रिलायन्स, आयटीसी नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजारातील मागील दहा दिवसांमध्ये प्राप्त केलेल्या तेजीला अखेर चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी विराम मिळाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 264 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि इन्फोसिस यांच्या समभागात घसरण राहिली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या घसरणीमुळे दिवसअखेर सेन्सेक्स 263.72 अंकांनी घसरून 48,174.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 53.25 घसरुन निर्देशांक 14,146.25 वर बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीदरम्यान निफ्टीने 14,244.15 अंकांचा उच्चांक प्राप्त केला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील आयटीसीचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचसीएल टेक यांचा समावेश आहे. दुसऱया बाजूला शेअर बाजारात पॉवर ग्रिड कॉर्प, भारती एअरटेल, ओएनजीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट या नुकसानीत होत्या.
अमेरिकेतील दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीचा परिणाम बाजारावर झाला आहे. यासह जगभरातील कोरोनासंदर्भात सादर करण्यात येणारे लसीकरणाचे प्रयोग आणि अन्य महत्वाच्या घडामोडींमुळे भारतासह आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसला.
नफा कमाईचा प्रभाव
दिवसभराच्या कामगिरीदरम्यान विक्रमी टप्प्यावर झालेली नफा कमाई आणि यामुळे शेअर बाजाराने मागील दहा दिवसांची कायम ठेवलेली तेजी गमावली आहे. परंतु येत्या काळात सादर होणाऱया केंद्रीय अर्थसंकल्पामधून नवीन पॅकेज सादर झाल्यास त्याचा लाभ हा गुंतवणूकदारांना होणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत. आशियातील बाजारात शांघाय आणि हँगसेंग तेजीत होते.









