सप्ताहातील अंतिम सत्रात सेन्सेक्स 233 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात चालू आठवडय़ातील सलग तिसऱया दिवशीच्या सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. एचडीएफसी बँक, टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या समभागांच्या घसरणीमुळे बाजार प्रभावीत होत बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीत बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 233.48 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 57,362.20 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 69.75 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,153.00 वर बंद झाला आहे. काही काळ सेन्सेक्सने 495.48 अंकांची घसरण नोंदवली होती.
भारतीय बाजारात मागील तीन सत्र घसरणीत राहण्यामागे देशासह जागतिक पातळीवरील प्रमुख घटना कारणीभूत राहिल्या आहेत. यामध्ये फेडरल रिझर्व्ह पुन्हा व्याजदर वाढविण्याच्या तयारीत असल्याच्या बातमीचा काहीसा परिणाम हा शेअर बाजारात होत गेल्याचे दिसून आले. यासह रशिया-युक्रेन युद्धजन्य स्थिती व कच्च्या तेलासह अन्य खनिज उत्पादनांचे वाढत जाणारे दर याचाही प्रभाव गुंतवणूकदारांवर होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
जागतिक बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट निर्देशांक व हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिला असून जपानचा निक्की व दक्षिण कोरियाचा कोस्पी हे काहीशे तेजीत राहिले आहेत. अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाला. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.44 टक्क्यांनी घसरुन 117.32 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे.
सेन्सेक्समध्ये शुक्रवारी टायटन, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, विप्रो, नेस्ले इंडिया, टीसीएस, लार्सन ऍण्ड टुब्रो, एचसीएल टेक, टाटा स्टील आणि एचडीएफसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र डॉ.रेड्डीज लॅब, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक आणि कोटक बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.









