दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर : गुणांकन बदलानंतरही डंका कायम : सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांची निराशा
प्रतिनिधी / ओरोस:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 2020-2021 या शैक्षणिक वर्षाचा दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे 100 टक्के निकालासह सिंधुदुर्गने कोकण बोर्डासह संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाने 100 टक्के निकाल नोंदवत सलग दहाव्या वर्षी राज्यात अग्रस्थानी राहण्याचा बहुमान संपादन करत एक नवे कीर्तीमान स्थापन केले आहे. यावर्षीचा कोकण बोर्डाचा आणि जिल्हय़ाचाही निकाल हा बोर्डाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा सर्वोच्च निकाल ठरला आहे, हे विशेष होय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दहावीच्या परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मूल्यमापनावर आधारित निकाल देण्याचे शासनाने जाहीर केले होते. यामध्ये इयत्ता नववीचा अंतिम निकाल व इयत्ता दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन, दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या गुणांकनानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हय़ातून मार्च 2021 च्या दहावी परीक्षेसाठी 10,088 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हे सर्व विद्यार्थी नवीन गुणदान पद्धतीनुसार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 4,804 मुली, तर 5,284 मुलांचा समावेश असून जिल्हय़ाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
यावर्षी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ
परीक्षा रद्द करून शासनाने मूल्यमापनावर आधारित केलेल्या गुणदान पद्धतीतही चांगला परफॉर्मन्स देत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विद्यार्थ्यांनी नवे कीर्तीमान स्थापन करीत अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कोकण बोर्डासह राज्यात सलग दहाव्या वर्षी अव्वल ठरला आहे.
गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल 98.77 टक्के लागला होता. यावर्षी तो 100 टक्क्यावर पोहोचला. तर गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा निकाल 98.93 टक्के लागला होता. तो यावर्षी 100 टक्क्यांवर पोहोचला. जिल्हय़ाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून एक नवा इतिहास रचला गेला आहे.
सर्व्हर डाऊन, विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
दरवर्षी बारावीचा निकाल दहावीच्या निकालाच्या आधी जाहीर होतो. मात्र यावर्षी दहावीचा निकाल आधी जाहीर झाला आहे. दरम्यान दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्याने निकालासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले होते. पालकही यामुळे अस्वस्थ झाले.
राज्याचा विभागनिहाय निकाल
विभाग टक्केवारी
कोकण 100
अमरावती 99.98
नाशिक 99.96
औरंगाबाद 99.96
लातूर 99.96
पुणे 99.96
मुंबई 99.96
कोल्हापूर 99.92
नागपूर 99.84
हा निकाल माध्यमिक शाळा स्तरावर विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आला असल्याने तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राहय़ धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा व अन्य मूल्यमापन इत्यादी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रति मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध होणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया दोन संधींमधून या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापुढेही दोन संधी उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुनःपरीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 85.97 टक्के लागला आहे. 271 विद्यार्थ्यांपैकी 233 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 33 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
अभिजात गुणवत्तेमुळे निकालात वाढ – शिक्षणाधिकारी अशोक कडूस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करून मूल्यमापनावर आधारीत गुणांकन करण्यात आले आहे. मात्र यातही जिल्हय़ाने बाजी मारत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. मुळातच जिल्हय़ातील विद्यार्थ्यांमधील ‘टॅलेन्ट’ हे अभिजात असल्याने हा निकाल 100 टक्के लागल्याची प्रतिक्रिया माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. आपल्या जिल्हय़ाने यावर्षी अव्वल क्रमांक हा राखलाच, पण त्याचबरोबर विक्रमी कामगिरीही नोंदविल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच असल्याचे ते म्हणाले.









