प्रतिनिधी / सांगरूळ
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करताना नेहमीच विश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम केले. यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते यांच्यातील भक्कम एकजुटीमुळे प्रचारासाठी कमी कालावधी असूनही प्रचार यंत्रणा गतीमान झाली. सांगरुळ गावासह कुंभी कासारी परिसरातील इतर गावाबरोबरच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपली स्वतःची उमेदवारी समजून तळमळीने पाच जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून प्रचार केला. यामुळेच विजयासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा पूर्ण करून शिक्षक आमदार होण्याचा बहुमान प्रथमच मिळवता आला आहे. असे प्रतिपादन नूतन शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी केले.
पूणे शिक्षक महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे सांगरूळमध्ये विजयी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. प्राध्यापक जयंत आसगावकर यांचे विधान परिषदेतील विजयानंतर गावात प्रथमच आगमन झाले. यावेळी गावाच्या वेशीपासुन पारंपारिक वाद्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रा.आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषदत निवडणुकीत शिक्षक मतदारसंघातून विजय होताच सांगून संपूर्ण कुंभी कासारी परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी हा विजयोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला. गावात त्यांचे आगमन होणार याची उत्सुकता सकाळपासूनच कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. सांगरूळ मधील सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येत जंगी मिरवणूकीचे आयोजन केले आले होते. ही मिरवणूक सांगरूळच्या वेशीपासून सुरू झाली.
यावेळी लेझीम, धनगर ढोल, हालगी अशी पारंपारिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी आणि गुलालाची उधळणीत सारा गाव न्हाऊन निघाला. या मिरवणूकीत आमदार आसगावकर यांचे गावातील अनेक महिलांनी औक्षण केले. बाजारवाडा येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या पायथ्याशी असलेल्या ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार मधील ज्योतिर्लिंग पादुकांचे पूजन करून मिरवणुकीची सांगता झाली .
दरम्यान मिरवणुकीच्या सांगतेवेळी आसगावकर यांनी आपल्या विजयासाठी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व शिक्षक कार्यकर्ते सांगरुळ शिक्षण संस्थेचे कर्मचारी व सांगरुळसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या तळमळीने प्रयत्न केलेत. या सर्वांचा माझ्या विजयात सिंहाचा वाटा असून शिक्षक आमदार म्हणून गावाच्या नावलौकिकात भर पडेल असे काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे विलास नाळे, एस एम नाळे, यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी शिक्षक संस्थाचालक संघचे वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस .डी लाड. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, शिक्षक नेते उदय पाटील ,के के पाटील ,कोजिमाशि पतसंस्थेचे संचालक समीर घोरपडे यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, को जि मा. शिक्षक. पत संस्थेचे चेअरमन कैलास सुतार’ गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.