नवरात्र म्हटले की स्त्रियांचा उत्साह वाढतो. कारण मुळातच तो आदिशक्तीचा उत्सव आहे. प्रत्येक दिवशी त्या आदिशक्तीचे एकेक रूप पूजले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी या देवी उपासनेच्या काळाला नवरात्र उत्सव असे म्हणतात. या प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाते. अनेक धान्यांचे रूजवण एका घटात रूजवून काढले जाते. समृद्धीचे ते प्रतीक असते. या काळात माता जगदंबेने कोलासुर राक्षस सेनेशी युद्ध करून नवमीच्या दिवशी त्यांच्यावर विजय मिळवला म्हणून हा दिवस शक्ती पूजनाचा दिवस मानला जातो. नवरात्रात नऊ दिवस चाललेल्या या युद्धात देवीच्या नऊ शक्ती देवीबरोबरच राक्षसांशी लढल्या. देवीच्या नऊ रूपांची जगदंबा, दुर्गा, काली, कुष्मांडा, महालक्ष्मी, सरस्वती इत्यादी नावे आहेत. ही रूपे म्हणजे स्त्रीशक्तीतले विविध गुण दर्शवणारे आहेत.
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।नमस्तस्ये नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। अर्थ:-जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीरूपाने निवास करते. तिला त्रिवार नमस्कार असो! अशाप्रकारे ती कधी शक्ती रूपात, कधी बुद्धी रूपात, कधी मातृ रूपात, कधी महालक्ष्मीच्या रूपात सर्व प्राणिमात्रांमध्ये वावरताना दिसते. ती जगज्जननी आहे. ती स्त्री आहे, म्हणूनच स्त्रियांसाठी हा उत्सव फार महत्त्वाचा आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: म्हणजेच जिथे स्त्री ची पूजा किंवा सन्मान होतो तिथे देव रमतात. भारतीय संस्कृतीने एवढा मोठा सन्मान स्त्रीला दिला आहे. तरीही आज प्रत्यक्षात तो तिला मिळतो आहे का हा प्रश्नच आहे. आजही स्त्रियांवरील अत्याचारांच्या असंख्य घटना आजूबाजूला घडत असतात. यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्यातील आत्मसन्मान जागा ठेवला पाहिजे. स्वसंरक्षणसिद्धताही ठेवली पाहिजे. ती काळाची गरज आहे. व्रतवैकल्ये करण्यापेक्षाही काही आधुनिक काळाला अनुसरून संकल्प सोडले पाहिजेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुरेसे शिक्षण, आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी, लग्नानंतरही आईवडिलांची जबाबदारी घेता यावी, मुलगा आणि मुलगी यांना समभावनेने वाढवण्याचा विचार मनात येऊ दे. मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांनाही सारखेच शिक्षण द्यावे. दोघांवरही सारखेच संस्कार करावेत. आजही अनेक क्षेत्रात मुली पुरुषांच्या बरोबरीने सर्व कामे करताना दिसत आहेत. अशीच त्या आदिशक्तीची कृपा आपल्यावर राहावी म्हणूनच सर्व काही मंगल करणाऱया त्या मंगलकारक, कल्याणकारक देवीला आपण सर्वांनीच शरण जाऊन प्रार्थना करूया.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।। नमस्तेएस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते।।








