वार्ताहर / शाहूपुरी :
अवघ्या तीन दिवसांवर दिवाळीचा सण आल्यामुळे सर्वत्र दिवाळीचाच माहोल सुरु झाला आहे. दिवाळीचा उत्साह अवघ्या जनजीवनावर दिसून येत असून, बाजारपेठांमध्ये झगमगाट वाढला आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची बाजारपेठेत रेलचेल वाढली असून, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे बाजारपेठेसह शहरातील रस्ते ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. दिवाळीसाठी होणाऱ्या खरेदीतून बाजारपेठत दिवसभरात लाखोंची उलाढाल होत आहे.
दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठांव आनंदाचा सण आहे. यावर्षी दिवाळी सणावर कोरोनाचे सावट असले तरी नागरिकांमध्ये उत्साह कायम आहे. अनलॉकनंतरचा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे बाजारपेठेलाही झळाळी आली आहे. गुरुवारी (दि.12) वसुबारसेने दिवाळीला प्रारंभ होत आहे. बाजारपेठेत कपडे, फटाके व दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.
दिवाळी स्वागताची जय्यत तयारी सुरू झाल्यामुळे सर्वत्र दिवाळीचाच माहोल तयार झाला आहे. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा या उक्तीचा प्रत्यय बाजारपेठेत येवू लागला आहे.कोरोनाची भिती नागरिकांमधून कमी झाली असल्याने दिवाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. दिवाळीसाठी नवीन वस्तूव वाहनांच्या बुकिंगसाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. कपडे, किराणा, सजावट साहित्य आदि दिवाळीसाठी होणाऱ्या खरेदीतून बाजारापेठेत दिवसभरात लाखोंची उलाढाल होत आहे.









