प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील पदवी कॉलेजच्या अंतिम वर्षाला प्रारंभ होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असून पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाला संक्रांतीनंतरचा मुहूर्त लागला आहे. 15 जानेवारीपासून पदवीबरोबरच अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयांचे प्रथम व द्वितीय वर्ष सुरू होणार आहे. महाविद्यालयांसाठी लागू करण्यात आलेल्या मार्गसूचीबरोबरच संबंधित जिल्हय़ांतील विद्यापीठांच्या आदेशांचे पालन करत सदर महाविद्यालये सुरळीतपणे सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्यादृष्टीने महाविद्यालये सुरू होणार आहेत.
2020-21 या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र, आता सर्व परिस्थिती सुरळीत होत असताना महाविद्यालयात ऑफलाईन शिक्षणाबरोबरच ऑनलाईन शिक्षणदेखील सुरू राहणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गसूचीचा अवलंब करत पदवी महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. प्राध्यापकांबरोबरच विद्यार्थ्यांनादेखील कोविड चाचणी सक्तीची नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी करावी लागलेली कोविड चाचणी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्यास अडचण होणार नाही.
पालकांचे संमतीपत्र-एसओपीचा वापर
इतर शैक्षणिक वर्ग सुरू करताना ज्या पद्धतीने पालकांची परवानगी आवश्यक होती, त्या पद्धतीने पालकांच्या संमतीचे पत्र व एसओपीचा अवलंब करावा लागणार आहे. थर्मल स्क्रिनिंग, मास्कची सक्ती, सॅनिटायझर्सचा वापर व सामाजिक अंतराचे भान राखत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय वर्गात विद्यार्थीसंख्येच्या मर्यादेचे पालन करावे. यामुळे 15 जानेवारीपासून पूर्वीप्रमाणे महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून जाणार आहे.
मार्गदर्शक सूचीनुसार वर्ग भरविण्यात येणार
प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील (भाऊराव काकतकर महाविद्यालय) 15 जानेवारीपासून पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या सूचनेनुसार आणि उच्चशिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचीनुसार सदर वर्ग भरविण्यात येणार असून संबंधित विद्यापीठाच्या सूचनांवर महाविद्यालयांची वाटचाल सुरू असल्याचे मत प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले.









